Saturday, 20 August 2016

#मैत्री

#मैत्री

कॉलेजचा पहिला दिवस  आणि  तू मला भेटलास ...एका गावातून  आलेली बावरलेली  गोंधळलेली थोडीशी बावळट अशी  मी F.Y.BCS चा वर्ग शोधत होते....ना आत्मविश्वास ना मोकळेपणा. माझी  अडचण  तू ओळखलीस  आणि मला माझा वर्ग  दाखवलास. शहरातल्या modern मुलींसमोर मी खूपच बावळट वाटत होते. सुरुवातीच्या  काळात माझ्याशी कोणी फारस बोलायचं नाही. तू मात्र बोलायचास. तू माझ्याशी बोलायचास म्हणून तुझे मित्र तुला हसायचे, तुझी चेष्टा करायचे, पण तू मात्र तस कधी दाखवल नाहीस.मला कळत होत पण मी हि तुला काही विचारल नाही. दिवस असेच सरत होते. आपली ओळख हळूहळू वाढत होती. तू मला कधी बदलायचा प्रयत्न  केला नाहीस पण मी मात्र हळूहळू बदलत गेले. तुझ्या सहवासात आत्मविश्वास मिळत गेला. शहरी वातावरणात हळूहळू रुळू लागले. बघता बघता  ६ महिने  निघून गेले. माझे  Terminal Examचे मार्क्स बघून नोट्स मागण्यासाठी का होईना वर्गातल्या मुली माझ्याशी  बोलू लागल्या. मी या शहरी वातावरणात चांगलीच रुळत  होते आणि मला माझा ग्रुपहि  मिळाला पण तू मात्र कायमच माझी priority होतास. मी हि  आता शहरातल्या modern मुलींसारखी smart झाले होते. माझ्याशी बोलतोस म्हणून तुला हसणारे तुझे मित्र, "ए तिच्याशी ओळख करून दे ना" अस म्हणून तुझ्या मागे लागत होते. तू मात्र हसून वेळ मारून न्यायाचास.असच SY चा वर्ष सरल. आता final year त्यामुळे आपण दोघेही busy झालो.  कॉलेज, क्लास, practicals यातच सारा वेळ  जाऊ लागला. माझ computer science आणि तुझं chemistry म्हणजे आपण दोन विरुद्ध टोक. आता रोज होणारी भेटही कमी होत होती. सगळ routine busy झाल होत तरीही कधीतरी एखाद्या निवांत सोनेरी संध्याकाळी तुझी आठवण यायची आणि मन बेचैन व्हायचं. कधीही कुठलाही problem असुदे, मग तो कितीही मोठा किंवा  छोटा, तुझ्याशी बोललं कि सगळच सोप होवून  जायचं.तुझ्याशिवाय मी म्हणजे मला अपूर्णच वाटायचे. मला आजही आठवतोय तो दिवस ज्या दिवशी मी माझ्या मनातले भाव तुझ्यासमोर व्यक्त केले. खरतर आपल्याला एकमेकांच्या भावना समजून घेण्यासाठी शब्दांची गरज कधीच नव्हती, पण तरीही मी माझ्या भावना तुझ्यासमोर व्यक्त केल्या. त्यावर तू म्हणालास ,"आपल नात खूप सुंदर आहे ग त्याला कुठल्याही नवीन नात्यात गुंफू नकोस.  आपल्यातली हि निखळ मैत्री माझ्यासाठी माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे ती मला अशीच आयुष्यभर जपून ठेवायची आहे.  तू ज्याला प्रेम समजतेस ते प्रेम नाही तुला माझी वाटणारी ओढ आहे. प्रेम आणि मैत्री यामध्ये एक नाजुकशी पुसटशी रेष असते. ती रेष तू ओळख.  निट विचार कर आणि तूच ठरव तुला काय हवय.  तरीही तुझी इच्छा असेल तर आपल्या नात्याला तू म्हणशील ते नाव द्यायची माझी तयारी आहे. आपली निखळ मैत्री कि प्रेम निवड तुलाच करायची आहे...." मला त्याच म्हणण पटल होत. अर्थात त्याने सांगितलेली कुठलीही गोष्ट मला पटणार नाही असा कधीच झाल नव्हत. दाटून आलेले मेघ दूर झाले आणि सगळ कस स्वच्छ झालं. आपल्यातल नात म्हणजे निव्वळ निखळ मैत्री  हेच सत्य होत बाकी सगळा भावनांचा खेळ होता.
   तू नेहमीच मला समजून घेतलस. मला काय हवय हे माझ्या पण आधी आणि माझ्यापेक्षा जास्त चांगल तुला माहित असायचं. माझ लग्न ठरलं तेव्हा माझ्या भावी पतीला तू आपल नात आधीच स्पष्ट केलस  आणि त्याच्याशी बोलल्यावर तो माझ्यासाठी खरच योग्य आहे हि पावतीही दिलीस आणि मी निर्धास्त झाले. तुझ्या लग्नाच्या वेळी बायकोकडून जणू आठव वचनच घेतलास कि ती आपल्या मैत्रीच्या आड कधीच येणार नाही. हे सार घडत असताना प्रत्येक नात तू जपत होतास. नाती जपण मी तुझ्याकडूनच शिकले. माझ्या नवऱ्याचा अपघात झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू. माझ्यावर तर जणू आभाळ कोसळलं. किती दिवस दु:खात बुडाले होते कोणास ठावूक त्यातच आधीच तब्येतीने नाजूक असणाऱ्या माझ्या सासूबाई तर पूर्ण खचल्या. सासरे आधीच गेलेले, त्यातच मुलाच अस अपघाती जाणं, त्या तर पूर्ण कोलमडून गेल्या. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझी  ८ वर्षाची  मुलगी खूपच गांगरून गेली. पण त्यावेळी मात्र तू आणि तुझ्या सुस्वभावी पत्नीने आम्हाला सावरल. सुदैवाने माझी नोकरी असल्यामुळे मला आर्थिकदृष्ट्या काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण सासूबाई अंथरुणाला खिळल्या त्या कायमच्याच. आणि वर्षभरात त्याही मला सोडून गेल्या. माहेरी तर गरिबी आणि इथली नोकरी सोडून तिथे जावून कस रहाणार? अशा वेळी तू मला आधार दिलास आणि मी माझ्या घरीच रहायचं ठरवलं. संकटं सांगून येत नाहीत आणि आली कि पिच्च्छां सोडत नाहीत तसा झालं. Recession च्या लाटेत तुझी नोकरी गेली. तू नवीन नोकरी न शोधता व्यवसाय करायचा ठरवलास.प्रश्न होता भांडवलाचा, शिवाय तुझ्या बायकोचाही याला विरोध. अशा वेळी मी माझी सगळी savings तुला दिली तेव्हा तू  बायकोला म्हणालास आमची मैत्री हीच माझी investment आहे. आणि मला म्हणालास या investment मध्ये मी तुझा नुकसान नाही होवू देणार. तू प्रचंड मेहनत करत होतास आणि यशाची एकएक पायरी पटापट चढत होतास. तुझ कुटुंब, तुझा business या साऱ्या जबाबदाऱ्यांबरोबरच मैत्रीच नातही जपत होतास. पण या साऱ्यानंतर समाजामध्ये आपल्या दोघांबद्दल नको ती चर्चा होवू लागली त्याची झळ आपल्या दोघांच्याही कुटुंबाला बसत होती. तुझ घर तू सावरलस. पण माझ्या teenager मुलीला समजावण्याच अवघड कामहि तू अगदी सहज केलस. ते हि तिच्यावर न चिडता आणि तिला न दुखावता. "तुझं आणि आईच काय नातं आहे? तू का येतोस आमच्याकडे?" या तिच्या प्रश्नावरच तुझ उत्तर ऐकून तर मी सुद्धा थक्क झाले होते. किती सहज सांगितलस तिला तू ,"झाडाला गुरफटलेल्या वेलीच जे नातं झाडाशी असतं तेच नातं आमच्यामध्ये आहे. कधी ती झाड झाली तर कधी मी. ना झाडाने कधी वेलीवर आपला अधिकार सांगितला ना वेलीने झाडावर.  एक निरपेक्ष नातं असत दोघांमध्ये तसच तुझ्या आईच आणि माझं निरपेक्ष मैत्रीच नातं आहे.........माझ्या मुलीला  मैत्री आणि प्रेमातल्या नाजूक रेषेची ओळख योग्य वयातच झाली निव्वळ तुझ्यामुळे आणि माझ्या मनात दाटलेले मेघ जसे दूर झाले होते तसेच तिच्याही झाले.
       अशा किती गोष्टी लिहू? आज मला माझ्या आयुष्याचा नवा जोडीदार मिळालाय. एका नव्या संसाराची सुरुवात करतेय मी.  अर्थातच तुझ्या पुढाकारामुळेच. मला आणि माझ्या मुलीला या लग्नासाठी  तयार करण्याच शिवधनुष्य  तू अगदी सहज पेललस. आज मी हे घर, हे शहरच नाही तर हा देश सोडून चाललेय. माहितेय मला एका click वर कोणालाही बघता येतं कोणाशीही बोलता येत पण तरीही आज मनातल सार मी या चिठ्ठीत लिहितेय ...सतत तुझ्याजवळ राहण्यासाठी.  जाता जाता सुचलेल्या चार ओळी लिहिते.
           नाती असतात रक्ताची, नाती असतात व्यवसायाची
          काही नाती फक्त स्वप्नांची तर काही सहज जोडलेली
          असच एक नातं जुळतं मैत्रीच
           उत्कठ भावानेच कि शब्दांच्या पलीकडलं?

*संपूर्णत: काल्पनिक......................

Saturday, 30 July 2016

‪#‎मनमानसी‬........

कुठे आहेस रे तू? किती मस्त संध्याकाळ आहे. सकाळच्या पावसानंतर आलेल्या सोनेरी किरणांनी सगळा चिखल वाळून गेलाय आणि सगळ कस लख्ख झालय. आकाशात पावसाळी ढग जमा झालेत. पावसापुर्वीचा गारवा जाणवायला लागलाय त्यातच सकाळी पडलेल्या पावसानन्तरचा गारवाही मिसळलाय सगळ कस अगदी छान वाटतंय. घरी परतणारे पक्षांचे थवे मला वाकुल्या दाखवतायत असं उगाचच वाटतंय. आठवतंय अशाच अनेक संध्याकाळी आपण एकत्र घालवल्यात कितीतरी स्वप्न बघत. आज जवळ सगळ आहे, स्वप्न आहेत, आठवणीही आहेत पण तू कुठे आहे रे? हरवलायस तू या मायावी जगात.... .................. तेव्हा मला नुसत बघण्यासाठी सगळी schedules cancel करून मी गेलेल्या पावसाळी पिकनिक spotला अगदी आवर्जून मित्रांबरोबर यायचास.त्या गर्दीतही तू मला शोधून काढायचास.....आणि उगाचच ," तू इथे कशी? अस आश्चर्याने विचारायाचास. सगळ माहित असायचं एकमेकांना तरी अचानकच भेटल्यासारख दाखवायचं आणि निघताना एकत्रच निघायचं.............. त्याच रोडवर जर ट्राफिक jam झालं तर तू खुशच.... तेवढाच वेळ एकत्र घालवायला मिळेल म्हणून ................आज मात्र तुला तिथल्या गर्दीचा वैताग येतो, ते traffic boring वाटत. अशा spot वर जाण्यापेक्षा घरात पांघरून घेऊन लोळत पडायचं आणि मुसळधार पाउस सुरु असेल तर भजी आणि गरमागरम चहाची फर्माईश करायची . तेवढच काय ते गोड बोलण......अन्यथा laptop, mobile मध्ये डोकं घालून बसण आणि तेही कमी पडल तर TV असतोच जोडीला. बर TV वर तरी छान Romantic गाणी एकत्र बसून बघावी तर ते नाही कुठले तरी southचे पिक्चर बघत बसायचं...................how unromantic...............एखाद्या दिवशी सकाळी लवकर उठून किवा अगदी पहाटेच मस्त टेकडीवर फिरायला जाव. पक्षांचा किलबिलाट, दुरूनच कुठून तरी एखाद्या मंदिरातून येणारा मंजुळ घंटानाद, मंद गार वारा...........हे सार अनुभवत एखाद्या दगडावर शांतपणे हातात हात घेऊन बसून रहाव ..............हळूच तुझ्या खांद्यावर डोक ठेऊन तुझ्यावरील माझा अधिकार व्यक्त करावा................. तर.............................नाही ...........तुझी सुट्टी म्हणजे उशिरापर्यंत झोपण्याचा हक्काचा दिवस आणि ऑफिस म्हणजे ..........दिवसभर दगदग असते ऑफिस मध्ये ....जरा तरी रेस्ट घेउदेना अस वैतागून म्हणायचं आणि पांघरूण डोक्यावर ओढून झोपून रहायचं.............घाई तर नेहमीचीच.....................बर संध्याकाळी तरी निवांतपणा....................... मस्त मावळत्या सुर्यानारायचे रंग बघत गरमागरम कॉफीचे घोट घेत .....दिवसभरच्या गोष्टी एकमेकांशी बोलत बसाव ..............घरी येईपर्यंतच अंधारून आलेलं असत.................... आल्यावर फ्रेश होऊन सोफ्यावर किवा बेडवर स्वत:ला झोकून द्यायचं आणि हो TV, mobile, laptop यातलं काहीतरी जवळ हवच ...........अन्यथा तू तर अपूर्णच..............किती रुक्ष झालायस रे तू .............कधी जाणवत तरी असेल का तुला माझ्या मनात काय चाललय? कुणास ठाऊक.................पण असा दूर नको जावूस रे...............जवळ असून दुरावा सहन करण आता कठीण जातंय................... ये ना तू परत.....................बरसणाऱ्या पावसासारखा बेभान बेधुंद होऊन .................उमलणाऱ्या रातराणीसारखा गंध घेऊन .............ओघळणाऱ्या प्राज्क्तासारखा अलगद, हळुवार होवून...........................येशील? तुझी वाट बघतेय.............

Thursday, 21 July 2016

‪#‎निशब्द‬--

सलोनासा सजन है ओंर मै हू......रेडीओवर लागलेल्या या गाण्यामुळे सायली कॉफीचा घोट घेता घेता तशीच थांबली. खर तर आज खूप दिवसांनी तिला अशी निवांत संध्याकाळ मिळत होती. मुसळधार पाउस, गार झोबणारा वारा, वाफाळलेली कॉफी...आणि terrace मध्ये रेडीओवरची गाणी ऐकत बसणे ...... खूप आवडायचं तिला. आज कितीतरी दिवसांनी नव्हे वर्षांनी हे सगळ जुळून आल होत. घरी कोणीच नव्हते आणि ६.३० वाजल्याशिवाय कोणी येणारही नव्हते. पण या गाण्यातल्या सुरांबरोबर ती भूतकाळातल्या सुरात कधी हरवली ते तिच तिलाच कळल नाही
          First Year ला असताना singing competition मध्ये तिने हेच गाणं म्हटलं होत. तेव्हा सूत्रसंचालन करणाऱ्या second year च्या सागरने तिला स्वतः भेटून सांगितल होत तुझ गाण खूप छान झाल. किती खुश झाली होती तेव्हा सायली.....बस आता first prize नाही मिळाल तरी चालेल आणि prize distribution च्या वेळी जेव्हा singing competition च first prize मिळाल तेव्हा तर सागरने हात मिळवून अभिनंदन केल होत तिचं, तेव्हा तर हवेतच होती ती . हात धुवूच नये अस वाटत होत..... कॉफीचा घोट घेता घेताच तिला हसू आल.. किती वेडी होते मी तेव्हा. त्यानंतर तर ती जणू फक्त सागर साठीच कॉलेजमध्ये जात होती. तो दिसला नाही तर मन बेचैन व्हायचं. तो दिसला कि त्याला नजरेत साठवून ठेवावस वाटायचं..
         दिवसामागून दिवस जात होते. FY ची परीक्षा संपली. आता तर दोन महिने सुट्टी म्हणजे दोन महिने सागर दिसणार नाही . ती उदास झाली. सागर होस्टेलमध्ये रहायचा म्हणजे सुट्टीत तो गावी जाणार हे निश्चितच होतं. ती उदासपणे बसून होती तेवढ्यात तिची मैत्रीण नेहा आली आणि म्हणाली " good news आहे सायली ....सागर १५ दिवसातच परत येईल. अग तो TY ला गेला ना आता त्यांचे vacation classes सुरु होतायत २ मे पासून. सायली मनातून खुश झाली. तिचा आणि त्याचा क्लास एकाच ठिकाणी होता. तिची vacation batch नसली तरी क्लास तिच्या घराजवळच होता.
सुट्टी संपून कॉलेज सुरु झाल. दिवस मजेत जात होते. आतातर सागरची क्लासरूम तिच्या क्लासरूमच्या बरोबर समोरच होती. सतत जाता येता सागर दिसायचा. त्या दिवशी सायली कॅन्टीन मध्ये तिच्या मैत्रिणीची..नेहाची वाट बघत बसली होती.. मुसळधार पाऊस पडत होता .lecture ला बसायचा तिचा अजिबात मूड नव्हता. कॅन्टीन मध्ये २/३ जुनिअर मुले सोडली तर बाकी कोणीच नव्हत. तेवढ्यात सागर तिथे आला. तिच्याकडे बघून नेहमीप्रमाणे गोड हसला. "lecture नाही का आज ?" त्याने विचारले . "नाही आज मूड नाही. बोअर होता सावंत सरांच्या पिरिअडला." ती म्हणाली. "तुझ्याशी बोलायचय थोड - सागर म्हणाला. क्षणभर तिचा विश्वासच बसत नव्हता. ती गप्पच बसली छातीतली धडधड अजूनच वाढली होती. "वेळ कधी आहे तुला?" सागरच्या आवाजाने ती भानावर आली आणि कसाबस म्हणाली ....बोल. "नाही इथे नको... .सागर. मग कुठे ?कधी? ....स्वतःला सावरत सायली म्हणाली. सागरचा क्लास संपल्यावर सायलीचा क्लास असे. त्यामुळे तो म्हणाला... माझा क्लास सुरु झाल्यावर बरोबर १५ मिनिटांनी , क्लासच्या समोरच्या गल्लीतल्या गणपतीच्या देवळाजवळ भेटशील?" पण तुझा क्लास ..." मी क्लास बुडवणार आहे आज " तिचं बोलण मध्येच तोडत सागर म्हणाला . तिने होकारार्थी मान डोलावली. ठीक आहे भेटू मग संध्याकाळी .... अस म्हणून तो निघून गेला. तिचा विश्वासच बसत नव्हता. आपण स्वप्नात तर नाही ना? तिने स्वतःलाच चिमटा काढून पहिला.
         घरी गेल्यावर सायली फ्रेश होऊन जेवायच्या आधी कितीतरी वेळ आराशासामोरच उभी होती. तिला सतत सकाळचाच प्रसंग आठवत होता . लाजत, हसत, स्वप्न रंगवत ती संध्याकाळची वाट बघत होती. जेवायचाही भान नव्हत तिला. कुठला ड्रेस घालू ? सागरला कुठला रंग आवडत असेल? कितीतरी प्रश्न ....पण सगळे सागर भोवती फिरणारे. पिंक कलरचा ड्रेस, नाजुकसे मोत्याचे कानातले, पिंक कलरची हलकीशी लिपस्टिक आणि मोकळे सोडलेले केस .. सायली खूपच सुंदर दिसत होती. देवळाजवळ स्कूटर पार्क करून ती देवळात गेली सागर अगोदरच आला होता. त्याला बघताच तिच्या छातीत धडधडायला लागल. तिने देवाला नमस्कार केला. एक दिवस मी आणि सागर जोडीने येऊ इथे.. मनात विचार आला आणि ती लाजली. सायली बाहेरच्या कट्ट्याजवळ ये. सागरच्या आवाजाने ती भानावर आली आणि प्रदक्षिणा घालून बाहेर कट्ट्याजवळ गेली. सागर वाटच बघत होता. बसना ....सागर म्हणाल. नाही नको, तू बोल काय बोलायचय .....सायली.
          सागरने बोलायला सुरुवात केली...सायली मी माझ्या आयुष्याचा खूप वेगळा विचार केलाय. मी जे करायच ठरवलंय ते मी कोणालाच सांगितल नाहीये आणि सांगाणारही नाहीये. मी खूप practical आहे . भावनांनी विचार करणं म्हणजे मला मूर्खपणा वाटतो. माझ्या आयुष्यामध्ये कधीच कुठली मुलगी नव्हती आणि नसेल. मुळात प्रेम वगैरे या सगळ्या गोष्टी मला फाल्तू वाटतात. या गोष्टींवर माझा विश्वासच नाहीये. ................सायलीचे डोळे पाण्याने डबडबले होते. सागरचे लक्षच नव्हते तो बोलतच होता पण सायलीला काहीच ऐकू जात नव्हत. तिचा स्वप्नांचा मनोरा क्षणा क्षणाला कोसळत होता. त्याच्या प्रत्येक शब्दाचा तिच्या मनावर आघात होत होता. सायलीने डोळ्यातल पाणी डोळ्यातच थांबवल. कितीतरी वेळ बडबड करून तो थांबला. त्याने तिच्याकडे बघितलं ती शांतपणे उभी होती. त्याच बोलणं थांबल्याची खात्री झाल्यावर ती म्हणली ...."पण हे सगळ तू मला का सांगतोयास?' तिच्या या प्रश्नावर तो चकित झाला होता, काय बोलावे त्याला काहीच सुचेना. आता तो निशब्द झाला होता. थोडावेळ कोणीच काही बोलत नव्हत . मग स्वतःला सावरत तो कसबस म्हणाला, मला वाटल तू माझ्यात इंटरेस्टेड आहेस. I mean तू माझ्यावर प्रेम करतेस. पुन्हा शांताता. तो अस direct बोलेल अस सायलीला वाटला नव्हत. ती जरा गोंधळली. थोडा विचार करून आणि मनाची तयारी करून ती म्हणाली ...."हो, आवडतोस तू मला, खूप आधीपासून, तूला पहिल्यांदा बघितल होत तेव्हापासून ..पण मी तुझ्यावर प्रेम करते कि नाही ते नाही सांगता येणार. एवढच वाटतं कि सतत तू जवळ असावास सुखात, दुःखात, बरसणाऱ्या पावसात, रणरणत्या उन्हात, कडाक्याच्या थंडीत सतत तुझा हात हातात असावा ,हे प्रेम असेल तर हो करते मी तुझ्यावर प्रेम. आता मात्र दोघही निशब्द. बराच वेळ तसाच शांततेत निघून गेला. कोणीच काही बोलले नाही. मी निघते .... शांततेच भंग करीत सायली म्हणाली आणि त्याच्या उत्तराची वाट न बघता ती निघून गेली.
         घरी आल्यावर सायलीने स्वतःला बेडवर झोकून दिले, इतकावेळ थांबवलेला अश्रूंचा महापूर ओसंडून वाहू लागला. ती दुखावली गेली होती.. घरी कोणीच नव्हते.तिचे आई बाबा दोघही नोकरी करायचे ,त्यामुळे दिवसभर सायली घरात एकटीच असे. कितीतरी वेळ ती तशीच रडत होती. दुःख, संताप, अपेक्षाभंग या साऱ्या भावना अश्रूवाटे वाहून जात होत्या. एवढ्यात doorbell वाजली...त्या सवयीच्या आवाजानेही सायली दचकली. तिने घड्याळात बघितले तर ६.४५ होत आले होते. बापरे ६.४५ वाजले म्हणजे आई आली असेल...ती स्वतःशीच म्हणाली. डोळे पुसून तिने दार उघडले. एवढ्यात फोन वाजला... सायलीने फोन घेतला.. "hello सायली क्लासला का आली नाहीस?, काय म्हणाला सागर? फोन नेहाचा होता. नेहा , तू आत्ता माझ्या घरी येऊ शकतेस? ...सायली. ok येते, कुठलाही प्रश्न न विचारता नेहा म्हणाली. नेहा घरी आल्यावर त्या दोघी टेरेसवर गेल्या. सायलीने घडलेली सगळी घटना नेहाला सांगितली. त्या दोघी कितीतरी वेळ terrace वर होत्या. सायलीच दुःख नेहाला बघवत नव्हत. रडणाऱ्या सायलीला ती मायेने थोपटत म्हणाली , सायली होईल सगळ नीट, रडू नकोस ना please. नाही नेहा , आजपासून सागर हा विषय माझ्यासाठी संपला..सायली म्हणाली . हे बघ सायली उगाच रागाच्या भरात कुठलाही निर्णय घेऊ नकोस.....नेहा . नाही नेहा माझा निर्णय झालाय.....सायली. नेहा आणि सायली बालपणापासूनच्या मैत्रिणी. सुरवातीला एकाच शाळेत- एकाच वर्गात आणि आता एकाच कॉलेजमध्ये पण दोघीही विरुद्ध स्वभावाच्या सायली हुशार, आत्मविश्वासी , ठाम पण थोडी तापट , कोणालाही फाटकन बोलणारी, तर नेहा शांत, संयमी, कोणालाही न दुखावणारी. "सायली... ८ वाजून गेले किती वेळ टेरेसवर थांबणार आहात?" आईच्या हाकेने दोघीहि टेरेसवरून खाली आल्या. सायलीला by करून नेहा निघून गेली. 
          दिवस भराभर जात होते. सायलीच आयुष्य पूर्वीसारखच चालू होत पण आता त्यात एक पोकळी निर्माण झाली होती ....सागर नावाची. सायलीने स्वतःला अभ्यास आणि गाणं यात गुंतवून घेतले. क्लासच्या वेळी अनेकदा तिची सागरशी नजरानजर व्हायची पण ती नजर फिरवून दुसरीकडे बघायची. नेहा हे सार बघत होती पण काहीच बोलत नव्हती.. तीला सागरच्या डोळ्यात सायालीसाठी प्रेम दिसत होत पण तिला माहित होत कि सायलीची समजूत घालणे शक्य नाही. बघता बघता वर्ष संपल. final exams संपून vacation सुरु झाले. दरवर्षीप्रमाणे TY ची Vacation batch २ मे पासून सुरु झाली. सायलीला SYला distinction मिळाली होती सहाजीकच ती आता scholar batch student. होती. आता तर तीला वेळच नसायचा क्लासेस, कॉलेज, गाण्याचा रियाज यातच तिचा सगळा वेळ जायचा. अशातच TY चा Result लागला. सागरला second class मिळाला होता. सागरने post graduation साठी पुन्हा त्याच कॉलेजमध्ये admission घेतली. 
    सागर आणि सायली आता फारस समोरासमोर येत नव्हते. त्यांच्या क्लासच्या , कॉलेजच्या सगळ्याच वेळा आता बदलल्या होत्या. last year असल्याने सायली खूप मेहनत घेत होती. खर तर सुरुवातीपासूनच सायली खूप carrier oriented आणि महत्वाकांक्षी होती, अर्थात तिच्या घरातही तसच वातावरण होत. तिची आई bank manager तर वडील class one ऑफिसर होते. सायलीला नेहमीच metro city च खुप आकर्षण होतं. त्यामुळेच तिने post graduation साठी पुण्याला जायचं ठरवलं होत. मोठ्या कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी, बंगला, गाडी, high lifestyle , स्टेटस ,..या सगळ्याच गोष्टींच तिला प्रचंड आकर्षण होतं. 
      बघताबघता वर्ष संपल आणि final exam पार पडली. Final Result अपेक्षेप्रमाणे लागला, सायली First Class with distinction मिळवून पास झाली होती आणि नेहालाही first Class मिळाला होता. Result नन्तर नेहाने post graduation साठी पुन्हा त्याच कॉलेजमध्ये admission घेतली. सायली अर्थातच पुण्याला जाणार होती. पुण्याला जाण्यापूर्वी सायली आणि नेहा एकमेकींना भेटल्या. त्याचवेळी नेहाने सायलीजवळ पुन्हा एकदा सागरचा विषय काढला .....त्यावर सायली चिडून म्हणाली.....नाही नेहा, मला त्याच्यासारख्या भावनाशुन्य माणसाबद्दल काहीही सांगू नकोस, ..प्रेमाचा अर्थ तरी कळला असेल का कधी त्याला? काय तर म्हणे या सगळ्या फालतू गोष्टी आहेत...अग practical असणं म्हणजे काय भावनाशुन्य असणं का? सायली संतापून बोलत होती, मनात इतके दिवस धुमसत असलेल्या ज्वालामुखीचा उद्रेक होत होता. तिच बोलून झाल्यावर नेहा म्हणाली, सायली, अस एकाच भेटीत त्याच्याबद्दलच मत बदललं तुझं? अग अस तडकाफडकी कोणाबद्दल मत बनवू नये ग...कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात. तू एकच बाजू बघतेयस. दुसऱ्या बाजूचा कधी विचार तरी केलायस का?...... आणि मला तो करायचाही नाहीये .......संतापून सायली म्हणाली. काय गरज होती त्याला मला असा भेटायला बोलावून हे सगळ सांगायची? मी काही बोलले होते का त्याच्याशी? .....सायली संतापाने बोलत होती .तू खरच विसरू शकतेस त्याला?...नेहाने शांतपणे विचारलं. नेहाच्या या प्रश्नाचं सायलीकडे काहीच उत्तर नव्हत. तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं, ते तसच थांबवत सायली म्हणाली ....मला आता या सगळ्याचा विचार करायचाच नाहीये आणि please हा विषय नको. मी आज खूप खुश आहे .माझ इतक्या दिवसाचं स्वप्न पूर्ण झालय. मला जिथे हवी होती त्याच college मद्ध्ये admission मिळालेय. पण तिथे तू माझ्याबरोबर नसशील याचच वाईट वाटतंय. मीही तुला खूप miss करेन सायली ...नेहा रडवेली होवून म्हणाली. सायालीलाही खूप वाईट वाटलं. दोघीही एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडल्या 
         MBA च college सुरु झाल होतं. नवीन कॉलेज, नवीन शहर सायालीसाठी सगळच नवीन होत. या सगळ्या नव्या वातावरणात ती नेहाला खूप miss करत होती. सहाजिकच होतं, आतापर्यंतच त्यांच सगळ शिक्षण एकत्रच झाल होतं. हळूहळू सायली या नव्या वातावरणात रुळू लागली होती. नवे मित्र मैत्रिणी जोडताना हळूहळू ती सागरपासून दुरावत चालली होती. बघता बघता दोन वर्ष सरली . नेहाच post graduation पूर्ण झाल आणि तिचं लग्नही ठरलं . सायलीच मात्र अजून एक वर्ष बाकी होतं. नेहाच्या लग्नाच्या बातमीने सायली खूप खुश झाली होती आणि थोडी उदास पण. कारण आता सुट्टीत ती घरी जाईल तेव्हा तिला नेहा भेटणार नाही . नेहाच्या लग्नाच्या धमाल आठवणी घेऊन सायली पुन्हा पुण्याला आली. आता MBA च Last Year होत. त्यात campus च टेंशन. सायली खूप मेहनत घेत होती. Last year च पाहिलं sem संपत आल होतं ... .आणि अशातच एक दिवस आईचा फोन आला ... सायली अग स्थळ आलय तुला पुण्याच....मुलगा Multinational co.त नोकरी करतो MBA झालाय ...पुण्याला बंगला आहे त्यांचा आणि आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. .... आई अग आत्ता कुठे लग्न? अजून माझ MBA अजून complete व्हायचंय .....campus साठी खूप मेहनत घेतेय मी .....मला चांगला job मिळवायचाय .....सायली वैतागून बोलत होती. अग नुसत बघायला काय जातंय?आणि मी कुठे आताच मुहूर्त काढायला निघालेय , आत्ता नुसता बघण्याचा कार्यक्रम करुया, तुम्ही एकमेकांना पसंत केलत तरच लग्न ठरेल...असं म्हणून आईने फोन ठेवला. सायली मनातून वैतागली होती. पण नन्तर तिने विचार केला कि जाऊदे , आई बाबांची इच्छा आहे तर बघायचा कार्यक्रम करुया तसही मी नाहीच म्हणणार आहे. . क्षणभर मनात सागरचा विचार आला. पण तिने तो लगेचच झटकला. 
सायली तयार झाली. खूप सुंदर दिसत होती ती . आज तिचा 'तो' बघायचा कार्यक्रम होता. ती आई बाबांबरोबर जायला निघाली.. गाडीत बसल्यावर तिच्या लक्षात आल आपण ज्याच्यासाठी जातोय त्या मुलाचं नावसुद्धा आपल्याला माहिती नाहीये. "आई, नाव काय ग त्या मुलाचं?" सायलीने विचारलं. "लवकर विचारलास",आई हसत म्हणाली. सायलीलाही हसू आल. एवढ्यात एका बंगल्यासमोर गाडी थांबली. तो बंगला बघून सायली तर हरखून गेली. गाडीचा आवाज ऐकून त्या बंगल्यातून कोणीतरी गेटजवळ येऊन अगदी अदबीने त्यांना बंगाल्यामद्धे घेऊन गेले. तिच्या आई बाबांच्या आणि त्या मुलांच्या आई बाबांच्या गप्पा चालू झाल्या. सायलीला खरतर खूप ऑकवर्ड वाटत होत.
            आतल्या खोलीतून एक handsome मुलगा बाहेर आला. त्याला कुठेतरी पाहील्यासारखा वाटलं सायलीला. हा माझा मुलगा निखिल ..त्याच्या बाबांनी ओळख करून दिली. थोडी बोलणी झाल्यावर निखिल तिला बंगला दाखवण्यासाठी म्हणून घेवून गेला आणि दोघाना जरा एकांत मिळाला.सगळा बंगला फिरून दोघही गार्डनमध्ये गेले. गार्डन छोटं होतं पण खूप सुंदर होत. संध्याकाळच्या सोनेरी उन्हात तर ते अधिकच आकर्षक दिसत होत ....अगदी सायालीसारख. तुमच घर आणि गार्डन दोन्ही खूप छान आहे......सायली म्हणाली. Thank God तुम्हाला बोलता येत.... निखिल गोड हसत म्हणाला. सायालीही मंद हसली कारण आल्यापासून खरच ती काहीच बोलली नव्हती. काय बोलाव तिला काहीच सुचत नव्हत.काहीतरी बोलायचं म्हणून सायली म्हणाली," तुमच्याबद्दल काहीतरी सांगाना.. " "काय?"......निखिल." काहीही तुमची lifestyle, तुमचा job तुमचे मित्र मैत्रिणी, कॉलेजमधील गोष्टी, आयुष्यातील कोणी खास न विसरता येण्यासारखं", सायली म्हणाली. तिच्या प्रश्नाचा रोख लक्षात घेत निखिल म्हणाला.... "कोणीतरी खास असं कोणी नाहीये माझ्या आयुष्यात..... हा एक मुलगी आवडायची कॉलेजला असताना पण ती आधीच engaged होती....नंतर MBAला असतानाहि एक मुलगी आवडली होती , आवडली कुठली मी तर प्रेमातच पडलो होतो तिच्या" ....."मग तिचं काय झालं? का ती पण engaged होती", त्याच बोलणं मद्ध्येच तोडत थोडस वैतागूनच सायलीने विचारलं. "नाही नाही , ती engaged नव्हती, म्हणूनच तर आजचा बघण्याचा कार्यक्रम होतोय"' निखिल हसत म्हणाला. क्षणभर सायलीला काहीच कळल नाही. तिने गोंधळून निखीलकडे बघत विचारलं.." म्हणजे? मी समजले नाही?" "अग तूच होतीस ती मुलगी," निखिल मिश्कील हसत म्हणाला. आपण एकाच कॉलेजमद्ध्ये होतो तेव्हा, आठवतंय का?,personality contest, Library च्या बाहेर चिखलात पडलेल्या तुझ्या notes, त्यावरून तुझ झालेल भांडण. "yess म्हणजे कॉलेज king निखिल साने ...TY MBA Finance, कॉलेज topper correct?...सायलीने excite होऊन विचारलं. correct! memory चांगली आहे हा तुझी ..निखिल हसत म्हणाला. तरीच मला तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटत होत...सायली म्हणाली. बोलता बोलता ती दोघ एकेरीवर कधी आली ते त्यांनाच कळल नाही. "खर तर मला तेव्हा खूप राग आला होता तुझा मी मेहनतीने काढलेल्या सगळ्या notes, तुझा धक्का लागल्यामुळे चिखलात पडून खराब झाल्या होत्या" .... सायली हसत म्हणाली . म्हणाली. "मलाही..... मी sorry म्हणून पण तुझी बडबड चालूच होती ....पण मग नंतर कॉलेजच्या Annual Functionला तुझ गाणं ऐकल आणि तुझ्या आवाजाबरोबर तु पण आवडायला लागलीस. "बेदर्दी बालमा तुझको ,मेरा मन याद करता है.......काय गाणं म्हटलयस तेव्हा? त्यानंतर तुझ आवडण प्रेमात कधी बदललं तेच कळल नाही. तेव्हाच ठरवलं तुझ्याशीच लग्न करायचं. नशिबाने तू engaged नव्हतीस.....निखिल हसत म्हणाला. हे तुला कस कळल? ....सायलीने आश्चर्याने विचारले. "मुलांना मुलींबद्दल सगळ्या बातम्या काढता येतात madam", त्याशिवाय का तुझ्या घरी direct मागणी घातली ? निखिल हसत म्हणाला. पण मग तेव्हा का नाही विचारलस?........ सायली. "तेव्हा मी last year ला होतो शिवाय campus पण टेंशन होत आणि मुख्य म्हणजे मी काहीच कमावत नव्हतो आणि settle झाल्याशिवाय कुठल्या मुलीला propose करण मला पटणार नव्हतं पण तेव्हाच ठरवलं job मध्ये settle झालो कि direct लग्नाचीच मागणी घालायची. settle झाल्यावर मी माझ्या घरी आई बाबांना सगळ सांगितलं आणि त्यांनी तुझ्या आई बाबांना ....निखिल म्हणाला. "काय आई बाबांना हे सगळ आधीपासूनच माहिती होतं? पण मला काहीच बोलले नाहीत, सायली आश्चर्याने म्हणाली. "कारण मी तस सांगितल होतं, हे सगळ मला स्वतःहून तुला सांगायचं होत....निखिल. अच्छा अस आहे तर ....सायली गमतीने म्हणाली. तर मग तुझा होकार समजू का? निखिलने गुलाबाच फुल तिच्यासमोर धरत विचारलं. सायलीला खर तर निखिल आवडायला लागला होता. पण तरीही असा direct लग्नचा निर्णय घ्यायला तिचं मन तयार होत नव्हत. "मला विचार करायला थोडा वेळ हवाय", सायली निखिलला म्हणाली. "ok take your own time", निखिल शांतपणे म्हणाला. काही वेळ तसाच शांततेत गेल्यावर सायलीने निखिलला विचारलं, "तुला माझ्याबद्दल काही जाणून घ्यावस नाही वाटत ?" नाही....निखिल सहजपणे म्हणाला. अग मला तुझ्याबद्दल अगोदरपासूनच माहिती आहे. मी सांगितल ना तुला मुलांना कुठल्याही मुलीची माहिती काढणे अशक्य नसत .....निखिल. पण माझ्या भूतकाळाबद्दल ...तिचं बोलणं माद्धेच तोडत निखिल म्हणाला, भूतकाळाबद्दल.....म्हणजे त्या बेदर्दी बालमाबद्दल? मिश्किलपणे निखिलने विचारलं. तुला कस माहित? आश्चर्यचकित होत सायलीने निखिलला विचारलं. "मला काहीच माहित नाही, पण तुझ्या गाण्यातून तुझ्या भावना कळत होत्या, तू गाणं नुसत गात नव्हतीस तर ते जगत होतीस, त्यावरूनच मी अंदाज केला. पण तसही तुझ्या भूतकाळापेक्षा मला वर्तमान आणि तू हो म्हणालीस तर आपल भविष्य जास्त महत्वाच आहे. आणि तुझ्या त्या बेदर्दी बालमाला मी thanksच म्हटलं पाहिजे, तो बेदर्दी नसता तर तू तेव्हा engaged असतीस. निखिल हसत म्हणाला."सायलीही निखीलकडे बघून मंद हसली. आता तर तो तिला अधिकच आवडायला लागला होता. निखिल आणि त्याच्या family चा निरोप घेऊन सायली आई बाबांबरोबर रूमवर आली. आई बाबा दुसऱ्या दिवशी सकाळीच परत जाणार होते, त्यामुळे सायलीला त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालवता आला नाही म्हणून ती मनातून थोडी नाराज झाली होती. रात्री मात्र तिला सारखा निखिल आठवत होता. तिला आठवत होत कॉलेजमध्ये कितीतरी मुली निखिलच्या मागे होत्या , पण निखिल मात्र तेव्हापासून फक्त आपल्यावर प्रेम करतो हे ऐकून ती सुखावली होती. 
           सायली आणि निखिलच्या आता वारंवार भेटी होऊ लागल्या होत्या. ती त्याच्यामद्धे गुंतत चालली होती. अखेर विचार करून तिने आपला निर्णय सांगितला , " मी लग्नाला तयार आहे , पण मला आधी माझ carrier करायच आहे. त्यामुळे MBA complete झाल्यावर किमान १ वर्ष job करूनच मी लग्न करेन". निखिलने अर्थातच हि अट मान्य केली. दोघांच्याही घरी आधुनिक वातावरण असल्यामुळे तसा प्रोब्लेम नव्हता. पण MBA च अर्ध वर्ष आणि त्यानंतर अजून १ वर्ष हे दोघांच्याही मातोश्रीना पटत नव्हत. अखेर आधी साखरपुडा करायचा  ठरवून सगळ्याचीच मर्जी राखण्यात आली. लग्न ठरल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ सायलीच्या आई बाबांनी तिला mobile गिफ्ट केला. त्या काळात नुकतेच mobile सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ लागले होते. निखीलकडे तर अगोदरपासूनच mobile होता. दिवस असेच मजेत चालले होते. Mobile मुळे तिच आणि निखिलच दिवसातून अनेक वेळा बोलण व्हायचं आणि जवळपास रोजची संध्याकाळ दोघं एकत्रच घालवत होते. सायली निखिलच्या प्रेमात हळूहळू सागरला विसरत चालली होती. हुशार, सुंदर आणि आत्मविश्वासी सायलीचं campus मधून एका चांगल्या कंपनीत selection झाल. सगळ तिच्या मनाप्रमाणे घडत होत. निखिलसारखा rich , handsome, well settled, संस्कारी आणि मुख्य म्हणजे तिच्यावर खूप प्रेम करणारा life partner , campus मधून मिळालेला high profile job सायली जणू हवेत तरंगत होती. माझ्यासारखी भाग्यवान मीच अस तिला आता मनोमन वाटत होत.
यथावकाश ठरल्याप्रमाणे निखिल आणि सायलीचा साखरपुडा अगदी साधेपणाने पार पडला. साखरपुड्याला दोन्ही घरचे अगदी जवळचे नातेवाईक सोडून फारस कोणाला बोलावलं नव्हत. नेहा मात्र खास Bangalore हून तिच्या साखरपुड्यासाठी आली होती. सायलीला खुश बघून नेहाही सुखावली. कितीतरी वर्षांनी ती सायलीला इतकी आनंदी आणि समाधानी बघत होती. साखरपुडा झाल्यावर मात्र त्याच दिवशी नेहा Bangalore ला परत गेली कारण ती हि नुकतीच बंगलोरच्या एका college ला lecturerम्हणून नवीनच रुजू झाली होती त्यामुळे तिला जास्त रजा घेणे शक्य नव्हते. निखिलच्या भेटिपासुनच्या सगळ्या गोष्टी सायलीला नेहाशी प्रत्यक्ष भेटून share करायच्या होत्या पण नेहाच्या अशा लगेचच जाण्याने सहाजिकच सायली थोडी हिरमुसली.
            सायलीची final exams जवळ आली होती त्यामुळे सायलीला आता पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं होत. अर्थातच तिला निखिलला जास्त वेळ देणे शक्य नव्हते. म्हणूनच त्या दोघांनी एक पूर्ण दिवस एकमेकांसोबत घालवायचा ठरवलं. दिवसभर भटकंती, Long drive आणि मग Five star हॉटेलमध्ये candle light dinner. निखिलने तिच्यासाठी अशी एक खास romantic date plan केली होती. ते सगळ बघून सायली खूप खुश झाली होती. त्याच दिवशी निखिलने तिला सांगितल कि कंपनी त्याला तीन महिन्यांसाठी US ला पाठवतेय. सायली तर हरखूनच गेली. तिच्या महत्वाकांक्षी स्वप्नाना आता नवे पंख लाभले होते.
         पंधरा दिवसांनी निखिल US ला निघून गेला. त्याला Airportवर सोडायला सायली गेली होती. जाता जाता सायलीपेक्षा तोच जास्त भावूक झाला होता. "बघ मलाही नेल असतस तर...आज अस एकट्याला नसतं जायला लागलं .....सायली मिश्किलपणे म्हणाली ."अच्छा madam साखरपुड्याऐवजी लग्न केलं असतं तर जाडीने गेलो असतो आज "निखील हसत म्हणाला. एवढ्यात announcement झाली आणि सायलीने पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला निरोप दिला. निखिल गेल्यानंतर सायलीला खूपच एकटेपणा जाणवायला लागला. "निखीलवर इतक प्रेम करते मी कि त्याच्याशिवाय जगणं कठीण जातंय?' सायली स्वतःशीच म्हणाली. कुठेतरी वाचलेलं तिला आठवलं सहवासातल्या आनंदापेक्षा विरहातील दुःखच एखाद्याबद्दल आंतरिक ओढ निर्माण करतं.  सगळे विचार झटकून सायली परीक्षेच्या तयारीत गर्क झाली. यथावकाश परीक्षा पार पडली. प्रोजेक्ट्सच कामही पूर्ण झाल. Result लागला कि १५ दिवसांनी ती नवीन कंपनीत रुजू होणार होती . तोपर्यंत तिच्याकडे मोकळा वेळ होता. पण या वेळेचे सगळे plans तिने आधीच ठरवले होते. कॉलेज मधल्या मित्र मैत्रिणींबरोबर पिकनिक, भटकंती ,get together...यासाठी ती निदान १५ दिवस तरी पुण्यातच थांबणार होती. त्यानंतर ती घरी जाणार होती कारण नेहाही त्याच सुमारास माहेरी येणार होती. 
           एक महिना तर गेला आता १५ दिवस सगळ्या मित्र मैत्रिणींबरोबर मजेत जातील मग फक्त दीड महिन्याचा प्रश्न मग निखिल परत येईल. ..सायली स्वताशीच म्हणाली. तो परत आल्यावर काय काय करायचे हे plans ति ठरवत होती . तेवढ्यात तिचा mobile वाजला....Hello सायली ....पलीकडून आवाज आला ...हो मी सायलीच बोलतेय.....सायली म्हणाली. सायली मी तुषार बोलतोय ... तुषार देशमुख ....GJ कॉलेज..... आठवतंय का? पलीकडचा आवाज ऐकून सायली दचकलीच कारण तुषार हा सागरचा रुममेट आणि बेस्ट फ्रेंड होता. स्वतःला सावरत सायली म्हणाली .."हो ओळखल,बोल. सायली तुला आत्ता आपल्या गावी येणं शक्य आहे का? शक्य असेल तर आजच निघ....तुषार म्हणाला. पण काय झालय? सायलीने गोंधळून विचारले . ते फोनवर नाही सांगता येणार पण अस समज कि खूपच महत्वाच काम आहे आणि तुझ्याशिवाय ते अडलंय.....तुषार म्हणाला. ठीक आहे मी प्रयत्न करते ...सायली समजावणीच्या सुरात म्हणाली. प्रयत्न नको सायली confirm सांग....तुषार काकुळतीला येऊन म्हणाला. ok बुकिंग मिळालं तर आजच निघते मी ...एवढ बोलून तिने फोन ठेवला. तुषारच माझ्याशी काय काम असणार? आणि त्याला माझा mobile no कसा मिळाला? सायली विचार करत होती ,तेवढ्यात तिला निखिलचे शब्द आठवले, मुलांना कुठल्याही मुलीची माहिती काढणे अशक्य नसत. पण विचार करत बसण्यापेक्षा तिने बुकिंग ऑफिसला फोन करून आजच्या रात्रीच्या गाडीच बुकिंग confirm केलं. तिच्या आणि निखिलच्या घरीही फोन करून तसं कळवल. घरी आल्यावर सायलीने तुषारला फोन केला. तुषार म्हणाला आपण प्रत्यक्ष भेटून बोलूया. कुठे भेटायचं ते तू सांग, मी तुझ्या घरी येऊ कि तू माझ्या रूमवर येशील?, कि कुठे बाहेर भेटूया?तू ठरव आणि मला तस कळव पण एक मात्र लक्षात ठेव कि मला तुझ्या एकटीशीच बोलायचय. बाहेर भेटण्याचा पर्याय तिला कधीच मान्य नव्हता, त्यापेक्षा त्याच्या रूमवर जाऊन त्याला भेटणंच तिला जास्त सोयीस्कर वाटलं. तुषारच्या रूमचा पत्ता घेऊन ती त्याला भेटायला गेली. 
             सर्वसामान्य मुलांची असते तशीच त्याची रूम होती अस्ताव्यस्त पसरलेली. सायली येणार म्हणून त्याने रूम आवारण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न सायलीच्या नजरेतून सुटला नाही. "ये बस ना".... खुर्ची सरकवत तुषार म्हणाला. "काय झालय तुषार एवढ कसल महत्वाच काम आहे ?" ...सायलीने विचारले. कुठलीही प्रस्तावना न देता तुषार म्हणाला, सागरबद्दल बोलायचं. "काय.......मला त्याच्याबद्दल काहीही बोलायचं आणि ऐकायचं नाहीये....सायली चिडून म्हणाली. "सागरचा accident झालाय सायली, गेले १५ दिवस झाले तो हॉस्पिटलमध्ये admit आहे. बेशुद्ध आहे .त्याला ICUमध्ये ठेवलय.. डॉक्टरांच्या कुठल्याच प्रयत्नाना तो प्रतिसाद देत नाहीये. त्याच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे म्हणून मी तुला बोलावलंय ",...तुषार भावनाविवश होत म्हणाला. त्याच हे बोलण ऐकून सायली निरुत्तर झाली होती. तिला खूप मोठा धक्का बसला होता काय बोलाव तिला काहीच सुचत नव्हत. तेवढ्यात तुषारने तिच्यासमोर एक डायरी धरली आणि म्हणाला' " हि डायरी वाच सायली म्हणजे तुला आपोआपच कळेल कि तुला का बोलावलंय. "कसली आणि कोणाची डायरी आहे हि?", सायलीने विचारले. " सागरची! खर तर मलाही या डायरीबद्दल काहीच माहिती नव्हते. तुझा साखरपुडा झाल्याच कळल्यावर एक दिवस सागर माझ्याकडे आला होता. खूप उदास दिसत होता तो. त्याचवेळी एक गिफ्ट pack केलेला बॉक्स माझ्या हातात ठेवून म्हणाला, माझा आता यावर काहीही अधिकार नाही, मी आता या सगळ्या गोष्टी माझ्याजवळ ठेऊ शकत नाही. पण हि माझी आयुष्याची ठेव समजून तुझ्याजवळ जपून ठेव आणि शक्य असेल तर हा बॉक्स कधीही उघडून बघू नकोस. ...त्या दिवशी तो मला भेटला ते शेवटच, त्यानंतर दोनच दिवसांनी त्याचा accident झाला. समोरून येणाऱ्या एका भरधाव टेम्पोने त्याला उडवले आणि तेव्हापासून तो ICU मध्ये admit आहे . डॉक्टरांच्या कुठल्याच प्रयत्नाना तो प्रतिसाद देत नाहीये म्हणून मग मी न राहवून तो बॉक्स उघडला,कारण मला वाटत होतं की कदाचित त्या बॉक्समध्ये सागरला वाचवण्याचा मार्ग सापडेल. तो बॉक्स उघडताना सतत मनात येत होत कि मी हे चुकीच तर करत नाहीये ना? . पण हि डायरी वाचल्यावर माझी खात्री झाली की माझा बॉक्स उघडण्याचा निर्णय चुकीचा नव्हता." तुषार न थांबता बोलत होता आणि सायली सुन्नपणे सगळ ऐकत होती. तिचे डोळे पाणावले होते. थरथरत्या हातांनी तिने डायरी उघडली. 
        डायरीच्या पहिल्याच पानावर मोठ्याअक्षरात लिहील होत ..to my sweet love saayali....त्याच्यासोबतच singing competitionच्या वेळेचा तिचा एक फोटो आणि prize distribution च्या वेळेचे दोन फोटो, एक तिचा prize घेतानाचा आणि दुसरा तिच्या आणि सागरच्या हस्तांदोलनाचा. त्यानंतरच्या प्रत्येक पानावर सायलीच्या भेटीपासूनच्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा लिहिलेल्या होत्या. प्रत्येक पान त्याच्या प्रेमाचा पुरावा देत होत. वाचता वाचता सायली त्या देवळातल्या भेटीच्या दिवसापर्यंत आली. 
            सागरने लिहिल होतं..... "दुरूनच तू मला कॅन्टीनच्या दाराशी उभी दिसलीस , नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत होतीस. पाउस असाच मुसळधार कोसळत रहावा आणि मी तुझ्याकडेच असच बघत रहाव असा मनोमन वाटत होतं. . तू हि माझ्यात गुंतत चालली आहेस हे मला माहित होत. सगळ कळत होतं, पण नाही हे सगळ कुठेतरी थांबायला हव हे शक्य नाहीये, माझा मेंदू माझ्या मनाला समजावत होता. तू माझ्यात जास्त गुंतण्याआधीच तुला थांबवायला हवं. आणि मग विचार करून आणि मनाची पूर्ण तयारी करून मी तुला भेटायला बोलावले. मी जे करायच ठरवल होत ते माझ्या मनाला पटत नव्हत पण आपल्या दोघांसाठीही तेच योग्य होतं. देवळात झालेल्या आपल्या भेटीचा क्षणन क्षण मी माझ्या नजरेत साठवून ठेवलाय कारण कदाचित ती आपली शेवटची भेट होती . मी बोलत असताना तुझ्या डोळ्यात साठलेले अश्रू मला जाणवत होते पण तरीही मी कठोर झालो होतो , मला तस होणंच भाग होतं. तू निघते म्हणून निघून गेलीस क्षणभर तुला थांबवावस वाटल, वाटलं मनातला सगळ तुफान तुझ्यासमोर उधळून द्याव, तुला मिठीत घेऊन तुझे डोळे पुसावेत आणि तुला सांगाव कि खूप प्रेम करतो सायली मी तुझ्यावर अगदी वेड्यासारख, पण तरीही मी शांत राहिलो. मला माहितेय घरी जाऊन तू खूप रडली असशील पण मला खात्री होती कि तू माझ्यापासून दुरावशील. आपण दोघेही वेगळ्या वाटेचे प्रवासी आहोत सायली . या वाटा एकत्र येणच शक्य नाहीये. तू हुशार confident, carrier oriented आणि महत्वाकांक्षी . तुझ्यासमोर भव्य दिव्य आकाशाला गवसणी घालणारी स्वप्ने आणि मी मात्र साध आयुष्य जगण्यातच समाधान मानणारा. माझ्या अगदीच पुराणमतवादी नाही पण आधुनिक नसणाऱ्या कुटुंबात तुला सामावून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे माझ्या कुटुंबासोबत तुझीही फरफट करण्यासारख. तू मेट्रो सिटीच्या झगमगाटात रमणारी आणि मी गावातल्या हिरवळीत. तुझ multinational company मध्ये High profile job करण्याचं स्वप्न तर मी गावातल पिढ्यान पिढ्या चालत आलेलं दुकान सांभाळणार. तुला statusच आकर्षण तर मला घरातल्या आंब्याच्या आणि नारळी-पोफळीच्या बागांच . कस जमणार सायली आपल. माझ्या खेडेगावातल्या घरी तुझी घुसमट झाली असती. मला माहित होत कि तू खेडेगावातल्या एखाद्या परंपरा पाळणाऱ्या घरात कधीही सामावून जाऊ शकत नाहीस. म्हणूनच मी ठरवलं स्वतः थांबायचं आणि तुलाही थांबवायचं. आमच्या पिढीजात श्रीमंत घराला पैशाची काहीच कमी नाहीये पण त्यातून तुझी स्वप्न , तुझ सुख नाही विकत घेऊ शकत मी. कारण त्याच्या बदल्यात मला माझ्या कुटुंबाच्या अपेक्षाना तिलांजली द्यावी लागेल. कुटुंबातला एकुलता एक मुलगा आहे ग मी त्याना दुखावून कस चालेल. सायली खूप प्रेम करतो ग मी तुझ्यावर पण कधीच ते व्यक्त नाही करू शकत. तुझ्याबारोबरच्या क्षणांची खूप स्वप्न बघितली होती मी पण कधीच प्रत्यक्षात नाही आणू शकत. एक मात्र नक्की सांगतो माझ्या हृदयातील एक कोपरा फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच असेल....आयुष्यभरासाठी. ती जागा फक्त तुझी असेल तिला कधीच कोणी धक्का लाऊ शकणार नाही. तू कायम सुखात रहावस एवढीच माझी इच्छा आहे. कुठेतरी वाचलेल्या कवितेतल्या काही ओळी आठवतायत सायली ....
          एक सांगशील,
          आपले रस्ते अवचित कुठे; असे जुळले?
          आपल्याच नादात चालताना हे देखणे वळण कसे भेटले?
           क्षणाभोवती, हि कसली अनोखी रंगत खुलते आहे?
           जगणे व्हाव गाणं, अशी सुरांची रंगत जुळते आहे
          पण खरं सांगू ?
'          या वाटांच हे अस भेटणं बर नव्हे ,
           जीवघेणं उत्कट असेल पण ते खर नव्हे.
           तुझी दिशा पूर्वीच निश्चित ती बदलणं हिताचं नाही
           माझ्यापुरत बोलायचं तर मला माझी दिशाच नाही
           तुझ्या संगतीत आनंद आहे, आश्वासन आहे, दिलासा आहे
          माझ्या मात्र स्वप्नांच्या हातात फक्त भंगण्याचाच वास आहे
         म्हणून म्हणतो,
          अशा वाटांनी मुळात एकत्रच येऊ नये
          जीव जडवून चटका लाऊन निदान दूर होणं तरी असू नये.........................
    वाचता वाचता सायलीने इतका वेळ डोळ्यात साठवलेलं पाणी तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहू लागलं. किती चुकीच समाजत होती ती सागरला. खर तर तिने सागरला ओळखलंच नव्हत. त्याच प्रेम तिला कधी समजलच नव्हत. ती नेहमी स्वतःच्या विश्वातच दंग असायची. आता मात्र तिला नेहाचे शब्द आठवत होते," कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात सायली. तू एकच बाजू बघतेयस. दुसऱ्या बाजूचा कधी विचार तरी केलायस का?" तिला नेहाची खूप आठवण येत होती. अत्ता या क्षणी ती आपल्याजवळ असावी अस तिला सारख वाटत होत. खरच मी प्रेम केल होत सागरवर? सायलीच्या मनात द्वंद्व चालू झाल. तिचच मन आता तिच्याविरुद्ध उभ ठाकल होतं. स्वतःला सावरत सायली म्हणाली,"मला सागरला भेटायचंय" मला त्याच्याकडे घेऊन जाशील ? तुषारने फक्त होकारार्थी मान हलवली. हातातली डायरी बाजूला ठेऊन सायली त्याच्याबरोबर जायला निघाली. तुषारने मात्र आठवणीने डायरी बरोबर घेतली.
             सायली आणि तुषार हॉस्पिटल मध्ये गेले. सुदैवाने ती दोघ visiting hours मद्धेच तिथे गेली होती. ती दोघ गेली तेव्हा सागरची आई बाहेरच भेटली. तुषारने त्यांची आणि सायलीची ओळख करून दिली. तुषार आणि सायली ICU मध्ये गेली. दोघ आत जाताच सागरचे वडील बाहेर जावून थांबले. कारण ICU मध्ये फक्त दोन माणसांनाच थांबायची परवानगी होती. आत गेल्यावर मात्र सागरला पाहुन तिला रडूच आल. कितीतरी दिवसांनी ती सागरला बघत होती ते हि अशा अवस्थेमध्ये. हिम्मत करून ती सागरजवळ जाऊन बसली. त्याचा हात हातात घेऊन म्हणाली, " सागर काय अवस्था करून घेतलेयस स्वतःची . का सांगितल नाहीस मला सगळ. का एकट्यानेच सगळ ठरवलस. why saagar why अस म्हणून सायली रडू लागली.. तुषार शांतपणे मागे उभा होता. त्याच्याही डोळ्यात पाणी तरळले. दुखाचा आवेग ओसरल्यावर ती म्हणाली, " तू खूप मोठ्या मनाचा आहेस सागर, किती ओळखलस तू मला , माझी सगळी स्वप्न, माझे विचार, माझ्या आवडी निवडी सगळ तुला माहिती होते आणि मी मात्र तुला कधीच समजून घ्यायचा साधा प्रयत्नही केला नाही. मला माफ कर सागर. मी तुझं प्रेम कधी समजूच शकले नाही. पण तू हे सगळ मला का सांगितल नाहीस? एकदा सांगून तरी बघायचास आणि ठीक आहे मी नव्हते adjust होऊ शकत तुझ्या कुटुंबात पण तू तर माझ्याबरोबर adjust होऊ शकला असतास ना? मेट्रो city मध्ये राहून गावाकडची शेती, व्यवसाय सांभाळणारे कितीतरी लोकं आहेत. मी ही मदत केली असती तुला......... सायलीच्या या वाक्यावर मात्र तुषार चमकला. तो काही बोलणार इतक्यात नर्स आली व visiting hours संपल्याच सांगून त्याना बाहेर जायची विनंती केली. बाहेर जाऊन सागरच्या आई बाबांचा निरोप घेऊन दोघही जायला निघाली. तेवढ्यात ICU जवळ कसलीतरी धावपळ चालू झालेली दिसली. काय झालय काहीच कळत नव्हत. इतक्यात तुषारला ती मगाचची नर्स दिसली . तिच्याजवळ चौकशी केल्यावर कळल १५ दिवसानंतर सागरने हालचाल केलेय. अजून पूर्ण शुद्धीत नाही आलाय पण डॉक्टर प्रयत्न करतायत. हे ऐकून सायली आणि तुषार दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद तरळला. डॉक्टर बाहेर येईपर्यंत दोघांनी थांबायचे ठरवले. सागरचे आई बाबा ICU बाहेरच थांबले. तुषार आणि सायलीला मात्र नर्सने waiting रूममध्ये थांबायची विनंती केली. waiting roomमध्ये विशेष गर्दी नव्हती पण बसायला मात्र जागा नव्हती. तुषारने सायालीसमोर डायरीचे एक पान काढून ते वाचायला सांगितले. तेवढ्यात तुषारचा mobile वाजला तुषार बोलण्यासाठी म्हणून बाजूला गेला. सायलीने हातातल्या डायारीकडे बघितले तुषारने काढून दिलेले पान तिने उभ्याउभ्याच वाचायला सुरवात केली. ते वाचल्यावर मात्र सायलीचे डोळे अश्रुंनी डबडबले आणि आधारासाठी म्हणून मागच्या भिंतीला टेकली. पुढच काहीच ती वाचू शकली नाही. सागरने त्यात लिहील होत," मला माहितेय मी माझ्या भावना कधीही तुझ्यासमोर व्यक्त करणार नाही सायली कारण मला खात्री आहे तू माझ्यासाठी माझ्या गावात रहायला कधीच तयार होणार नाहीस उलट तू मला मेट्रो citiमध्ये रहावूनच गावाकडच सगळं मी कसं सांभाळू शकतो हेच पटवून द्यायचा प्रयत्न करशील. पण ते मला शक्य नाही. अश्रुंचा महासागर तिच्या डोळ्यातून वाहात होता. तेवढ्यात तुषार तिथे आला रडणाऱ्या सायलीकडे बघून तो पळतच तिच्याजवळ गेला. तुषारने तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण ती आता पूर्णपणे निशब्द होती.
               सायली.... कॉफी . निखिलच्या आवाजाने सायली भानावर आली. "अरे तू कधी आलास? आज लवकर ?"सायलीने आश्चर्याने विचारलं. "जेव्हा तू सागरच्या आठवणीत होतीस, निखिल म्हणाला. ते ऐकून सायली दचकून म्हणाली." पण तुला....तिचं बोलण मध्येच थांबवत निखिल म्हणाला , "मी आलो तेव्हा रेडीओवर सलोनासा सजन है...चालू होतं आणि तू कॉफी तशीच ठेऊन शांतपणे बसली होतीस, त्यावरूनच ओळखल मी." सायलीला उदास झालेली बघून निखिलने तिला जवळ घेतले आणि म्हणाला, its ok सायली, येणाऱ्या आठवणी थांबवता येत नाहीत. "मी खूप hurt केल ना तुला", सायलीने रडतच विचारलं. "नाही ग राणी...तिचे अश्रू पुसत निखिल म्हणाला. तरीही ती उदासच होती. निखिलने तिचा हात हातात घेऊन तिला जवळ घेतले आणि आकाशाकडे बोट करून म्हणाला," त्या तिथे आकाशात खूप तारे असतात ढग दाटून आल्यावर ते आपल्याला दिसत नाहीत पण आपण मात्र त्यांना दिसत असतो. सागरही त्यातलाच एक तारा बनलाय आता, तिथून कुठूनतरी तो तुला नक्की बघत असेल , त्याला अशी रडणारी, उदास सायली नाही हा आवडणार. सायलीने नेहमी सुखात रहाव हीच त्याची इच्छा होती. त्याच्या या बोलण्याने सायलीला अधिकच रडू आलं ती स्वतःला सागर आणि निखिल या दोघांचीही अपराधी समाजत होती. त्यांच्या प्रेमापुढे,त्यांच्या मनाच्या मोठेपणापुढे ती पूर्णपणे निशब्द होती आणि पाउस मात्र मुसळधार बरसत होता.
समाप्त.